दि. २७ सप्टे. २००८
आता मी पाच महिन्यांची झाली आहे. मागच्या महिन्यात मला पालाथी-उतानी होता येऊ लागले तेव्हा माझ्या आई बाबांना काय आनंद झाला होता सांगू! मी तीन महिन्यांची झाले तसे ते वाट पहात होते. त्यांना एक महिनाभर वाट पहायला लावली मी. पण आज मात्र त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का देऊन उधारी चुकती केली.
मागच्या दोन आठवड्यांच्या सर्दी-पडश्यातून बाहेर येऊन आज मला चांगलेच ताजेतवाने वाटत होते. दिवसभर आई-बाबांसोबत तसेच ताईसोबत खूप मस्ती केली होती.
संध्याकाळी मला खाली मोठ्या अंथरुनावर खेळायला सोडून आई स्वयंपाक घरात गेली. माझी ताई माझ्या आजूबाजूला खेळत होती व बाबा बातम्या वाचत बसले होते. या सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे कसे आणावे असा विचार आला. आणी काय... गडगड-गडगड... पोटावरून पाठीवर व पाठीवरून पोटावर... हाताने जमीनीवर रेटा तर पायाने पुन्हा पुढे सरकायचा प्रयत्न... जमेल तसे मी सैरा भैरा फिरु लागले... अर्थात आतापर्यंत आई-बाबा व ताई यांच्या नजरा माझ्यावर वळलेल्या होत्या. पंधरा-वीस मिनिटांनी शेवटी बाबांनी कौतुकाने उचलून घेऊन खूप-खूप पापे घेतले. आई व ताईंची सुद्धा पापे घ्यायला झुंबड उडाली... कारण काय माहिती आहे? मी आडवे-तिडवे फिरत-फिरत तब्बल आठ फूट पुढे सरकले होते.
आहे की नाही मी आता बढती बच्ची?
Saturday, September 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment